इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन प्रांतांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ५२ दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्या या दहशतवाद्यांमध्ये बहुतेक तालिबानचे होते, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे पंजाब प्रांतात सहा दहशतवादी मारले गेले तर गुरुवारी बलुचिस्तानमध्ये गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत ४१ दहशतवादी मारले गेले. याशिवाय खैबर पख्तूनख्वा प्रांतात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे पाच दहशतवादी मारले गेले. यात एका कमांडरचा समावेश होता, या दहशतवाद्यांनी लाहोरपासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रांतातील मियांवाली जिल्ह्यात पोलिस आणि सुरक्षा दलांशी संबंधित इतर संस्थांवर हल्ले करण्याची योजना आखली होती. मियावलीमधील छपरी डॅम भागामध्ये दहशतवादी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सीटीडीच्या पथकाने कारवाई केली. त्यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान सहा दहशतवादी मारले गेले तर आठ जण पळून जाण्यात यशस्वी झाले, असे पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने सांगितले. पंजाब प्रांतात केलेल्या अशाच एका कारवाईमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला गेला आणि ११ दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा व्यतिरिक्त, १५ डिसेंबर २०२५ रोजी पंजगुरमध्ये झालेल्या बँक दरोड्यात लुटलेले पैसे देखील जप्त करण्यात आले. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यातील डोमेल तहसीलमध्ये सुरक्षा दलांनी आणि पोलिसांनी टीटीपी कमांडरसह पाच दहशतवाद्यांना ठार मारले. ही चकमक १० तास चालली होती. कारवाईदरम्यान ३ सामान्य नागरिकही मारले गेले. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने या बागात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. पंजाब प्रांतात शस्त्रे, दारुगोळा, आत्मघातकी जॅकेट, ६ सबमशिन गन, ३ हातबॉम्ब आणि २०० काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला गेला.