मदतीच्या ट्रकची वाट बघणाऱ्या 51 पॅलेस्टिनींचा मृत्यू

खान युनिस (गाझा पट्टा) : गाझा पट्टीत अन्नपदार्थ घेऊन येणाऱ्या संयुक्त राष्ट्र आणि व्यावसायिक ट्रकची वाट पाहत असताना किमान ४५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने आणि स्थानिक रुग्णालयाने म्हटले आहे. खान युनिसमधील मुख्य पूर्वेकडील रस्त्यावर मदत ट्रकची वाट पाहणाऱ्या हताश पॅलेस्टिनी लोकांच्या गर्दीवर इस्रायली रणगाडयांनी गोळीबार केल्याचे रहिवाशांनी सांगितले. या हल्ल्यात किमान ५१ जण ठार आणि २०० जण जखमी झाले असून त्यापैकी किमान २० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात केंद्रे सुरू झाल्यापासून, इस्रायली सैन्याने अमेरिका आणि इस्रायली समर्थित मदत गटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या अन्न वितरण केंद्रांजवळ झालेल्या गर्दीवर वारंवार गोळीबार केला आहे, असे पॅलेस्टिनींचे म्हणणे आहे. यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले आहेत, असे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या घटनांमध्ये, इस्रायली सैन्याने त्यांच्या सैन्याशी संशयास्पद पद्धतीने संपर्क साधणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी गोळीबार केल्याचे मान्य केले आहे. गर्दीवर गोळीबार करणारे हमासशी संबंधित असल्याचा आरोपही इस्रायलने केला आहे.
दुसरीकडे वरिष्ठ इराणी कमांडरला ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. जनरल अली शादमानी या आणखी एका उच्चपदस्थ इराणी जनरलला ठार मारले असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. जनरल अली शादमानी याला नुकतेच खातम अल-अंबिया मध्यवर्ती मुख्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इराणने शादमानीच्या मृत्यूची तात्काळ कबुली दिली नाही. शादमानी हा इराणच्या निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्डमध्ये जनरल होता.





