नवी दिल्ली – पीएम केअर्स फंडातून सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील कोविड रुग्णालयांना सरकार 50 हजार “मेड इन इंडिया’ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देणार आहे. यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
या 50 हजार व्हेंटिलेटर्सपैकी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी 30 हजार व्हेंटिलेटर्स तयार करीत आहे. बाकी 20 हजार व्हेंटिलेटर्स एग्वा हेल्थकेअर आणि एएमटीझेड तयार करीत आहेत. आतापर्यंत 2 हजार 923 व्हेंटिलेटर्स बनविण्यात आले आहेत. यातील 1 हजार 340 व्हेंटिलेटर्स राज्यांकडे सुपूर्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांना ही व्हेंटिलेटर्स पुरविण्यात आली आहेत. चालू महिन्याच्या शेवटी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात अतिरिक्त 14 हजार व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.
सध्या करोना पार्श्वभूमीवर देशात कोविड रुग्णालये उभारली गेली आहेत. या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्सची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे पीएम केअर्स फंडातून ही मागणी पूर्ण करण्यात येणार आहे. करोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे व्हेंटिलेटर्सची गरज वाढली आहे. भारतात दररोज करोनाचे 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. अशा स्थितीत व्हेंटिलेटर्सची गरज ओळखून पीएम केअर्स फंडातील निधी यासाठी वापरला जात आहे.