पुणे – स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आदींना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वेकडून विशेष श्रमिक गाड्या सोडण्यात आल्या. यामध्ये मध्य रेल्वेंतर्गत सुटलेल्या 50 हून अधिक गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांकडून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल आदी ठिकाणांसाठी गाड्या सोडण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केल्यानंतर संबंधित मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना परराज्यातील त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. या गाड्यांमधून तिरूचिरापल्ली, तितलागड, बरौनी, खांडवा, जगन्नाथपूर, प्रयागराज, छपरा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ आदी श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आले आहे.