पुणे जिल्हा | उन्हाळी कांद्याची 50 टक्के लागवड

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील बागायती असलेल्या बर्याच भागात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षाप्रमाणे यंदाही उत्पादकांनी नर्सरीमध्ये बियाणे टाकण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, खेड तालुक्यातील कांदा सरासरी 6200 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते आतापर्यंत 50 टक्के लागवड झाली असली तरी बळीराजाला अवकाळी पावसाची धास्ती कायम आहे.
तालुक्यात रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, मका, बाजरी, गहू, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. उन्हाळी हंगामात पिकणारा कांदा हा चाळीमध्ये भरून ठेवता येतो किंवा येणार्या दिवाळीपर्यंत टिकवून ठेवता येतो. त्यामुळे शेतकरी भाव पाहून टप्प्याटप्याने विक्री करतात.
कांदा काढणीवेळी कांद्याला भाव कमी असले तरीसुद्धा चाळीत किंवा व्यवस्थित ठिकाणी भरून ठेवल्यास हा कांदा निश्चितपणे भाव देऊन जातो.
त्याच्या विक्रीतून बर्यापैकी रक्कम कांदा उत्पादकांच्या पदरात पडण्यास मदत होते. म्हणून उन्हाळी हंगामात पाणी असलेल्या ठिकाणी कांद्याची लागवड दरवर्षी होताना दिसून येते.
राजगुरूनगर कांदा लसूण संशोधन केंद्रात कांदा बियाणे सुमारे 2 हजार रुपये किलो तर खासगी दुकानात कृषी केंद्रात 2 हजार 500 ते 3 हजार रुपये किलो भावाने बळीराजाला विक्री होत आहे.
मजुरांची कमतरता आणि अवकाळी पावसाच्या संकटात कांदा पीक सापडले आहे. काही ठिकाणी मोठा अवकाळी पाऊस पडल्याने कांद्याचे नुकसान झाले.
रब्बी हंगामातील पिके (हेक्टर, टक्यांमध्ये पेरणी )
पीक***हेक्टर***पेरणी (टक्के)
कांदा***6200***45
ज्वारी***8874***65
गहू***1547***5
मका***2009***50
हरभरा***1879***1
टोमॅटो***300***30
डिसेंबरमध्ये होणार लागवड
साधारणपणे दोन महिन्यांत नर्सरीत कांदा रोप तयार झाल्यावर त्याची पुनर्लागवड करण्यास सुरुवात होते. खेड तालुक्यात अगोदर बियाणे टाकलेल्या शेतकर्यांची लागवड एक डिसेंबरपासून सुरू होणे शक्य आहे. पूर्ण डिसेंबर महिना ही लागवड सुरू राहील.
मार्चअखेर व 15 एप्रिलपर्यंत हा कांदा काढणीवर येतो. त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन व्यापारी जागेवरच खरेदी करून येथूनच हा कांदा राज्यासह परराज्यात पाठवतात. कांद्याचे अर्थकारण मोठे असले तरी त्याच्यातून निर्माण होणारा रोजगारही खूप मोठा आहे. कोटींच्या हिशोबाने विकणारा कांदा लाखोंच्या हिशोबाने मजुरांना कामही मिळवून देतो, हे वेगळे सांगणे ना लगे!





