पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पुन्हा 50 टक्के क्षमतेने धावणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी सर्व आगार व्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत.
शहरातील करोनाबाधित संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या बसेसचे 50 टक्के क्षमतेने संचलन सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लॉकडाऊननंतर सप्टेंबरपासून पीएमपीची सेवा पूर्ववत झाली. त्यावेळीदेखील प्रशासनाने 50 टक्के आसनक्षमतेनुसार नागरिकांना प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र, काही महिन्यातच या निर्णयाचा विसर प्रवासी आणि प्रशासनाला पडल्याचे चित्र होते.
मात्र, आता करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आसनक्षमतेबाबत निर्णय घेतला असून, याबाबत परिपत्रक जारी केले आहे. पीएमपीचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे 13 डेपोंतून सुमारे 1 हजार 500 बसेसचे संचलन सुरू आहे. या सर्व डेपोंच्या व्यवस्थापकांना सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनबाबत सूचना दिल्या आहे.
प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवण्याची सूचना
बसच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेणे, स्थानकावरील कंट्रोलर कम चेकरसेवकांनी बसमध्ये गर्दी असल्यास प्रवाशांना पुढील बसमध्ये बसण्याची व्यवस्था करावी, बसथांब्यावर सुरक्षित अंतरावर थांबण्याच्या सूचना द्याव्यात, मास्कशिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, बसमध्ये सॅनिटायझरने भरलेली बॉटल सुस्थितीत स्टॅन्डमध्ये ठेवलेली असावी, दैनंदिन जास्तीत जास्त बसेस गर्दीच्या वेळेस मार्गावर पाठवण्यात याव्यात, अशा सूचना आगार व्यवस्थापकांना पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.