पिंपरी – अत्यंत चुरशीच्या आणि तिरंगी म्हणून गाजलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26) 50.47 टक्के मतदान झाले. तिरंगी लढत असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा असतानाही ती फोल ठरली. चिंचवडच्या मतदारांनी आपला कौल देताना तब्बल 28 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले. चुरशीच्या ठरलेल्या मात्र घटलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे 2 मार्च रोजीच स्पष्ट होणार असल्याने आता गुरुवारी (दि. 2) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि अपक्ष राहूल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत जगताप-काटे आणि कलाटे यांच्यातच झाल्याचे आज स्पष्ट झाले.
रविवार (दि. 26) सकाळी सात वाजल्यापासून 87 मतदान केंद्रांवर 510 बुथवर मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. तसेच गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून मतदारांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या दोन तासांत केवळ 20 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने 3.52 टक्के मतदान झाले होते. नऊनंतर मतदार काही प्रमाणात बाहेर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. 9 ते 11 या कालावधीत मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने 10.45 टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदान झाले. यामध्ये 69 हजार 838 पुरूष तर 47 हजार 841 महिला अशा एकूण 1 लाख 17 हजार 680 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. उन्हाचा चटका वाढल्यानंतरही दुपारच्या दोन तासामध्ये 9.87 टक्के मतदान झाले होते. तर तीन वाजेपर्यंत 30.55 टक्के इतके मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदान झाले होते. यामध्ये 1 लाख 29 हजार 888 तर 1 लाख 3 हजार 728 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. पाचनंतर अचानक अनेक मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 964 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. त्यापैकी आज दिवसभरात एकूण 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी आपला हक्क बजाविला. यामध्ये पुरुष 1 लाख 57 हजार 820, महिला 1 लाख 29 हजार 321 व इतर चारजणांचा समावेश आहे. आज झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि. 2) रोजी मतमोजणी होणार आहे.
पोटनिवडणुकीत मतदान कमी होण्याचा इतिहासच
लोकसभा, विधानसभा अथवा अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक असेल तेव्हा मतदानाचा टक्का कमीच असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र, हाच इतिहास पुसण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी जास्तीत-जास्त मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते. यावेळेसही सोशल मीडिया, पथनाट्य, कीर्तन आदी माध्यमातून जास्तीत-जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जनजागृती केली. जनजागृतीवर लाखो रूपयांचा खर्च करूनही या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले आहे. तर 2019 विधानसभा निवडणुकीत चिंचवडमध्ये 53.59 टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या चार पोटनिवडणुकांमधील चिंचवडमध्ये झालेले मतदान अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दरवेळी साहेबांना मतदान करायचे, यावेळी स्वतःला मतदान केले – जगताप
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी परिवारातील सदस्यांसमवेत पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. “दरवेळी मी साहेबांना मतदान करायचे, यावेळी स्वतःला मतदान केले, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्याबरोबर भाजप नेते शंकर जगताप, लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या रेणुसे यांच्यासह घरातील इतर सदस्य उपस्थित होते.
चिंचवड विधानसभेत परिवर्तन निश्चित; येणारी दोन तारीख आपलीच – नाना काटे
चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडीने ताकदीने लढविली. विकासाच्या मुद्यावर आम्ही मतदारांना आवाहन केल्यामुळे मतदारही परिवर्तन घडविणार हे निश्चित आहे. मतदारांमध्ये दिसून आलेला उत्साह हा आमचा आत्मविश्वास वाढविणारा आहे. त्यामुळे येणारी दोन तारीख ही आपलीच असेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी व्यक्त केला. पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्रावर नाना काटे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर काटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना वरील प्रतिक्रिया दिली.
कलाटे यांनी सहकुटुंब बजाविला मतदानाचा हक्क
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कुटुंबीयांसह वाकड येथील माऊंट लिटेरा शाळेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्यासोबत आई कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांनीही मतदानाचा हक्क बजाविला आहे. चिंचवडचे भवितव्य ठरवत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची लोकांची मानसिकता आहे. मला प्रचारादरम्यान जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. लढत एकतर्फी झाली. माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया कलाटे यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना दिली.