पगार जास्त असूनही पैसा शिल्लक राहत नाही? बचतीसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

How to Save Money | पगार जास्त असूनही पैशांची बचत होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. महिनाखेरीस दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकांकडै पैसेच नसतात. मात्र, योग्य नियोजन आणि थोडीशी शिस्त लावून, तुम्ही पैशांची सहज बचत करू शकता. वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक शिस्तीचं महत्त्व अधिक वाढलं आहे. पुढील उपयोगी टिप्स वापरून तुम्ही पैशांची बचत करू शकता.
1. खर्चाचा आढावा घेऊन बजेट तयार करा
महिन्याअखेर पैसे कुठे गेले याचा विचार करण्याऐवजी, सुरुवातीपासूनच खर्च ट्रॅक करणे फायदेशीर ठरते. यासाठी एखादं मोबाइल अॅप किंवा एक्सेल शीट वापरता येते. रोजचा लहानसहान खर्च – जसे की कॉफी, सबस्क्रिप्शन सेवा, ऑनलाइन ऑर्डर यावर किती पैसा जातोय, हे लक्षात घेतल्यास बचत कुठे शक्य आहे हे सहज समजते.
2. अनावश्यक सबस्क्रिप्शन बंद करा
Netflix, Amazon Prime, Spotify यासारख्या सेवा अनेकदा अॅक्टिव्ह असतात, पण वापर मात्र होत नाही. त्यामुळे अशा अनावश्यक सबस्क्रिप्शनची यादी करून त्यांना त्वरित बंद करणे गरजेचे आहे. काही सेवा कुटुंबासोबत शेअर करून देखील खर्चात कपात करता येते.
3. बाहेर खाण्यावर मर्यादा ठेवा
डिलिव्हरी अॅप्स किंवा बाहेर जेवणावर होणारा वारंवारचा खर्च महिन्याअखेरीस मोठा होतो. त्यामुळे यावर मर्यादा असणे आवश्यक आहे. घरी जेवण तयार केल्यास आरोग्य आणि बचत दोन्ही साध्य होईल.
4. स्मार्ट शॉपिंगचा अवलंब करा
खरेदी करताना सवलत, कूपन कोड, कॅशबॅक यांचा उपयोग करावा. ब्रँडेड वस्तूंपेक्षा इतर चांगल्या वस्तूचा वापर करा. यामुळे खर्च कमी होऊन बचतही होईल.
5. बचत ‘सवयी’चा भाग बनवा
जसा प्रत्येक महिना सुरू होताच काही निश्चित खर्च केले जातात, तशीच काही रक्कम बचत खात्यात टाकण्याची सवय लावावी. दरमहिन्याला पगारातील काही रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवावी. तसेच, इतर गोष्टीत गुंतवणक करावी. यासाठी नेट बँकिंगमध्ये ऑटो-डिडक्ट सुविधा वापरणं अधिक सोयीचं ठरतं. या टिप्स फॉलो केल्यास नक्कीच तुमचे हजारो रुपये वाचतील.

