आळंदी – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी 5 पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एका घटनेत आळंदी वडगाव रोडवर गुरुवारी (दि. 12) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. दर्शन शिवाजी खैरनार (वय 25, रा. शिक्रापूर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दुसऱ्या कारवाईत चऱ्होली खुर्द येथे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (वय 28, रा. आपटी, ता. शिरूर), सुरज अशोक शिवले (वय 24, रा. आपटी, ता. शिरूर), मुकेश दरबार मुझालदे (वय 26, रा. वडू खुर्द, ता. शिरूर), पवन दत्तात्रय शेजवळ (वय 35, रा. नारायणगाव पुणे) कमलेश उर्फ डॅनी महादेव कानडे (वय 29, रा. मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 12 लाख रुपये किमतीची कार, एक लाख 50 हजार रुपये किमतीचे तीन पिस्तूल, 7000 रुपये किमतीचे सात जिवंत काडतूस असा ऐवज जप्त केला आहे.