बिजापूर – छत्तिसगढमध्ये रविवारी सुरक्षा दलांनी ५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये २ महिलांचाही समावेश आहे. संबंधित चकमक बिजापूर जिल्ह्यातील जंगलात झडली. डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट फोर्सच्या पथकांनी नक्षलींविरोधात संयुक्त शोधमोहीम हाती घेतली.
त्यावेळी सुरक्षा जवान आणि नक्षली आमनेसामने आल्याने चकमकीला तोंड फुटले. चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह आढळले. नक्षलींचा शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला.
छत्तिसगढमध्ये नक्षलींविरोधात धडक मोहिमा राबवण्याचे धोरण सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्या मोहिमांमध्ये नववर्षातील पहिल्या पंधरवड्याच्या आत १४ नक्षली मारले गेले. सरलेल्या वर्षात त्या राज्यात एकूण २१९ नक्षलींचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले.