शहापूर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे याठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या दुर्दैवी घटनेविषयी बोलताना,”शहापूरजवळ समृद्धी महामार्गाचं काम सुरु होते. त्यावेळी गर्डर लाँचिंग करत असताना तो कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्याबाबत आम्ही आता अधिकारी, पालकमंत्री हे त्या ठिकाणी पोहचले आहेत. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. सित्झर्लंडची कंपनी काम करत होती. मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. तसंच हा अपघात कसा झाला त्याची चौकशी होईल आणि कारवाईही केली जाईल” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले.
एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.





