काश्मीरमधील चकमकीत 5 जवान जखमी; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील चकमकीत शनिवारी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या चकमकीत 5 जवान जखमी झाले. संबंधित घटना कुलगाम जिल्ह्यात घडली. एका गावात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्यावेळी आमनेसामने आल्याने दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये 2 दहशतवादी मारले गेले. तर, 5 जवान जखमी झाले.
चकमकीवेळी चुकून गोळी लागल्याने पोलिसांच्या वाहतूक शाखेचा एक अधिकारी जखमी झाला. दरम्यान, जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातही सायंकाळच्या सुमारास सुरक्षा जवान आणि दहशतवादयांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा बळ धाडण्यात आले. त्या घटनेची अधिक माहिती तातडीने मिळू शकली नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून होण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा दले अधिक सतर्कता बाळगत आहेत. तसेच, नियमितपणे दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहिमाही राबवत आहेत.





