केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 5 गाड्या एकमेकांवर धडकल्या

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा सोमवारी संध्याकाळी अपघात झाला. विजयन कोट्टायमहून तिरुअनंतपुरमला परतत होते. सायंकाळी 5.45 च्या सुमारास वामनपुरम पार्क जंक्शन येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या पुढे जात असताना अचानक एक स्कूटर चालवणारी महिला कारसमोर आली.
महिलेने स्कूटर अचानक वळवल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी ब्रेक लावला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आपापल्या कारमधून ताफ्यातून खाली उतरले. त्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने वामनपुरम पार्क जंक्शनवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री विजयन जखमी झाले नाहीत याची खात्री केली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकाही होती.
पोलिस विभागाने अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला. पोलिस महिला स्कूटर चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की महिलेने अचानक स्कूटर का वळवली.





