भोर तालुक्यातील शेतकरी सत्याग्रह करणार
पुणे, दि. 21 – रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करून सरकारने मागेल त्यास काम द्यावे. या मागणीसाठी महाराष्ट्रभर हजारो शेतकरी सत्याग्रह करणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य भूमिहीन शेतमजूर व गरीब शेतकरी परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. भोर तालुक्यात सरकारी कचेऱ्यांसमोर दि. 22 व 23 रोजी सत्याग्रह होणार आहे.
57,110 स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन दिली
नवी दिल्ली – 1 लाख 64 हजार स्वातंत्र्य सैनिकांनी पेन्शन मिळावे म्हणून अर्ज केले होते. पैकी 14 ऑक्टोबरपर्यंत 57,110 स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्यात आले आहे.
अमेरिकेचे 50 ते 70 कोटी डॉलर्स युद्धात खर्च
वॉशिंग्टन – पश्चिम आशियात चालू असलेल्या अरब-इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेला आतापर्यंत 500 ते 700 दशलक्ष डॉलर्स खर्च आला आहे. अशी माहिती अंदाजपत्रक संचालक रॉयश यांनी व्हाइट हाउसमध्ये दिली. ते व्हाइट हाउसमध्ये प्रतिनिधींच्या सभेत बोलत होते. या खर्चाची सविस्तर माहिती मात्र दिली नाही.
आश्चर्य, विमान कोसळले पण सर्व उतारू सुखरूप!
माझातलान- एक मेक्सिकन विमान कोलीरॅडोतील डेन्व्हर येथे चालले असता कोसळले पण त्यामधील 123 उतारूंपैकी एकही जखमी झाला नाही हे विशेष. एका नांगरलेल्या शेतात हे विमान पडले.