48 वर्षांपुर्वी प्रभात : प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गुप्त पोलिसांचा वापर करीत नाही

मुंबई, ता. 17 – खुशवंतसिंग यांना दिलेल्या मुलाखतीत इंदिरा गांधी म्हणाल्या, “काही लोकांविरुद्ध मी गुप्त पोलिसांचा वापर करते हा मजवर करण्यात येणारा आरोप केवळ मूर्खपणाचा आहे. अशा तऱ्हेची गोष्ट आजवर कधीच घडली नाही.
खुशवंतसिंग – अमेरिकेतील “वॉटरगेट’ प्रकरणासारखे काही करता का?
इंदिरा गांधी – आपल्याकडे तसले काही नाही, मला जे काही समजते ते बहुसंख्य लोकांच्या गाठीभेटीतूनच समजते. आणि मला त्यांचेकडून जी माहिती मिळते ती अगदी अचूक असते आणि गंमत अशी की, मी ती माहिती गुप्तचर खात्याकडे सुपूर्द करते, आणि नंतर ते मला सांगतात, आम्ही तुमची माहिती खरी की खोटी त्याचा तपास केला तेव्हा तुमचीच माहिती खरी असल्याचे आम्हाला आढळून आले आहे.
100 रु. च्या नोटा किंवा भारी नोटा रद्द होत नाहीत
नवी दिल्ली – 100 रु. किंवा त्यापेक्षा वरच्या किमतीच्या नोटा बाद करण्याचा सरकारचा मुळीच विचार नाही, असा खुलासा अर्थखात्याचे राज्यमंत्री गणेश यांनी लोकसभेत केला. ते पुढे म्हणाले, सध्या चलनात 100च्या 29 कोटी नोटा आहेत. त्याची किंमत 29 अब्ज रुपये इतकी होईल. 1000 रु. च्या नोटा चलनात फक्त 4 लाख आहेत. 5000 रु. च्या नोटा 55 हजार आहेत व 10,000 रु. च्या नोटा 29000 इतक्या आहेत.
मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्याला सरकार मुळीच हात लावणार नाही!
मुंबई – मुस्लिमांच्या व्यक्तिगत कायद्यात काहीही बदल करण्याची सरकारची इच्छा नाही. हिंदू बहुसंख्य राज्यात मुख्यमंत्री मुसलमान होणे ही गोष्ट 5 वर्षांपूर्वी कल्पनेपलीकडे होती; पण आता मान्य झाली आहे.




