आनंदनगर दंगल प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल

पाच जणांना अटक; चिंचवड पोलिसांची कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) – आमच्यासोबत राजकारण करून आम्हाला येथे डांबून ठेवले आहे. आम्हाला बाहेर जावू द्या. करोनामुळे कोणी मरत नाही, असे म्हणत एका जमावाने दगडफेक करीत पोलिसांच्या बुथची आणि वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी 48 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते चार वाजताच्या दरम्यान घडली. तसेच याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

लक्ष्मण ठोकळ, संदीप वर्मा (दोघेही रा. पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड), विकास जाधव, रमेश कांबळे आणि तेजस मलेश गोपरेडी (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवनूल, विशाल मोरे, करण बोरूले, धन्या खंडागळे, बाळ्या, मुसा, बाब्या, विशाल भोसले, मल्हारी कांबळे, धीरज म्हस्के, महादेव सरोदे, विमल गायकवाड, शीला कांबळे, कलावती सोनटक्‍के, रेश्‍मा कांबळे, रोहन आसोदे, राहूल चलवादी, रोहित गोंदणे व इतर 25 महिला व पुरूष यांच्या विरोधातही दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक रोहिणी शेवाळे यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत करून मोठा जमाव जमविला. बाहेर सगळे व्यवहार सुरू झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखाली मग आम्हालाच येथे का डांबून ठेवले आहे. आमच्यासोबत राजकारण केले जात आहे. करोनामुळे कोणी मरत नाही. आम्हाला येथून बाहेर जाऊ द्या, असे म्हणत जमावाने सुरवातील पोलिसांशी वाद घातला.

त्यानंतर जमावने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरवात केली. पोलिसांच्या बुथमधील खूर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली. पोलिसांच्या शासकीय व खासगी वाहनांचीही तोडफोड केली. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पोलिसांनी पाच जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.