नवा समाज निर्माण करण्यासाठी महर्षी शिंदे यांच्यापासून स्फूर्ती घ्या- एसेम मिरज, ता. 2 – “भारत प्रभावी करण्यासाठी आर्थिक विषमता नष्ट केली पाहिजे. जातीय भेद नाहिसे केले पाहिजेत. नवा समाज निर्माण करण्यासाठी महर्षी शिंदे यांच्या कार्यापासून तरुणांनी स्फूर्ती घेणे जरूर आहे,’ असे उद्गार समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी मिरज विद्यार्थीसंघाच्या वसंत व्याख्यान मालेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन चरित्रासंबंधी बोलताना काढले. एसेम पुढे म्हणाले, विठ्ठल रामजी शिंदे फार मोठ्या गुणांचे विधान होते. त्यांनी स्वतःच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी जे विचार समाजापुढे मांडले, ते मला माझ्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी खऱ्या अर्थाने समजू लागले. तरुणपणापासून त्यांच्या विचारांची बैठक अध्यात्माची होती. विश्वधर्माची त्यांना ओढ होती. त्याचे ते चिंतन करीत व कर्मही करीत. जया-अमिताभ यांचा आज विवाह? मुंबई – चित्रपट अभिनेत्री जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांचा विवाह होणार आहे. असे चित्रपट व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. मात्र उभयतांपैकी कोणाची भेट न झाल्याने या बातमीस दुजोरा मिळालेला नाही. चित्रपट व्यवसायातील जाणकारांनी असे सांगितले की, जया ही “गुड्डी’ आणि अमिताभ यास “लंबू’ म्हणून चित्रपट रसिक ओळखतात. त्यांनी लग्नाचा निश्चय केला आहे. पावाशिवाय इतर पदार्थांच्या निर्मितीस त्वरित बंदी करा पुणे – सध्या तुटवडा भासत असलेल्या मैदा, साखर आणि वनस्पती तूप यांची बचत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मेवामिठाई, बिस्किटे, केक, नानकटाई आदिवर त्वरित बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार प्रभाकर कुंटे यांनी केली.