सरकार कमकुवत करणे हा राष्ट्रदोह
नवी दिल्ली, दि. 5 – सध्याच्या बिकट परिस्थितीत सरकार कमकुवत करणारी कोणतीही चळवळ देशविघातक म्हणूनच गणली जाईल, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे स्पष्ट केले. कमकुवत सरकार सत्तेवर असण्याची ही वेळ नाही, असेही त्या म्हणाल्या.
मोरारजींनी उपोषणाचा नाद सोडावा
मुंबई – मान्सून नंतर गुजरातमध्ये निवडणूका घेतल्या जातील, हे पंतप्रधान गांधींचे आश्वासन लक्षात घेऊन मोरारजींनी आमरण उपोषणाचा विचार सोडून द्यावा, असे मत खासदार शशिभूषण यांनी व्यक्त केले.
सायगॉनमधून अमेरिकनांना हलविणार
सायगॉन – “सायगॉन’मधील अमेरिकन व काही दक्षिण व्हिएतनामी लोकांचे स्थलांतर करण्यासाठी
4 अमेरिकन विमाने वाहतूक जहाजे पश्चिम पॅसिफिक महासागरांत उभी आहेत. प्रे. फोर्ड यांनी अद्याप जहाजांना व्हिएतनामी समुद्रात प्रवेश करण्याचा हुकूम दिलेला नाही.
शस्त्रबंदी परिषद बोलवावी
यूनो – जागतिक शस्त्रबंदी परिषद घेण्यासाठी यूनोचे सरचिटणीस डॉ. कुर्त वाल्डहीम यांनी जोरदार प्रयत्न करावेत, अशी मागणी रशियाने केली आहे. अशा परिषदेमुळे जागतिक शस्त्र निर्मितीला आळा बसेल, असे रशियाचे मत आहे.
कॅन्सरच्या वेदना
एल कॅजोन, कॅलिफोर्निया – मिसेस मार्जेरी नावाची 45 वर्षांची बाई येथे आहे. तिला कॅन्सर झाला आहे. ती मरणाची वाट पाहत आहे. वाट पाहून ती कंटाळली आहे. तिने कॅन्सरचे वर्णन पुढीलप्रमाणे केले- कॅन्सर म्हणजे अतिशय दुष्ट जातीचा फ्ल्यू व्हावा. त्याच्या वेदना दसपटींनी वाढवा. त्यातच तुम्हाला कोणी भोसकून मारत आहे व ते भोकसणेही शरीराच्या निरनिराळ्या भागात चालू आहे असे समजा मग तुम्हाला ज्या यातना भोगाव्या लागतील त्या म्हणजे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे वेदना दुसरे काही नाही.