सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण दारूबंदीची जरूरी
अहमदाबाद, दि. 29 – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण दारूबंदीची आवश्यकता आहे, असे आज सर्वोदय नेते जयप्रकाश नारायण व सं. कॉंग्रेसचे नेते मोरारजी देसाई यांनी प्रतिपादन केले. गुजरातमधील दारूबंदीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त जयप्रकाश म्हणाले की, दारूबंदीची उपयुक्तता व त्यामुळे समाजावर होणारे सुपरिणाम याची माहिती गुजरातमधील लोक त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावरून देशाच्या इतर भागातील लोकांना देऊ शकतील. दारूबंदी जारी केल्याने महसूल कमी होतो व त्यामुळे विकास कामावर परिणाम होतो, हा इतर राज्य सरकारांचा दावा जयप्रकाश नारायण व मोरारजी दोघांनीही फेटाळून लावला.
सिमेंटवरील निर्बंध उठणार
नवी दिल्ली – इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटवर गेल्या वर्षी सरकारने घातलेले सर्व निर्बंध 1 मे पासून उठविण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री टी. ए. पै यांनी लोकसभेत केली.
टॅक्स ऑन रेसिडेन्शियल प्रिमाइसेस हा कायदा घटनाबाह्य
मुंबई – महाराष्ट्र सरकारने 1974 मध्ये जारी केलेला राहत्या जागेवरील कराचा कायदा हा घटनाबाह्य असून चटई क्षेत्राच्या आधारावर असा कर वसूल करणे हे अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचे मत कायदेतज्ज्ञ न्या. व्ही. ए. नाईक यांनी व्यक्त केले आहे. 135 चौ. मीटरपेक्षा चटईक्षेत्र असलेल्या जागांवर हा कर बसविला आहे. 1 एप्रिलपासून हा कर वसूल केला जात आहे.