नॉमपेन्हचा अखेर पाडाव 5 वर्षे चाललेल्या संग्रामाचा शेवट नॉमपेन्ह, दि. 17 – कंबोडियाच्या राजधानीतले अखेरचे ठाणे सिंहनुक सैन्याच्या हाती पडल्यानंतर कंबोडियन सरकारने आज शरणागती पत्करली. वेढ्यात सापडलेले सैन्य शरण आल्यानंतर सिंहनूक सैन्याच्या आघाडीच्या पलटणी शहरात शिरल्या. कंबोडियाच्या सरकारच्या शरणागतीमुळे गेली 5 वर्षे चाललेला कंबोडियाचा संग्राम समाप्त झाला आहे. कंबोडियन सरकार शरण गेल्याचे बॅंकॉकमधील कंबोडियन वकिलातीच्या लष्करी अधिकाऱ्याने जाहीर केले. कंबोडियन सरकारचे मंत्री किंवा राजधानीमधील परदेशी लोक यांचा ठावठिकाणा समजला नाही. त्यांनी नॉमपेन्हमधील एका हॉटेलात युद्धरहित तटस्थ विभाग स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. कापड दुकान कामगारांसाठी लवकरच किमान वेतन बिल पुणे – महाराष्ट्रातील सुमारे 50 हजार कापड दुकानांतील कामगारांना किमान वेतनश्रेणी, नोकरीतील निश्चितता तसेच त्यांच्या इतर अनेक प्रमुख प्रश्नांवर विचार करून महाराष्ट्र शासन पुढील विधानसभा अधिवेशनात एक विधेयक सादर करणार असल्याचे मजूरमंत्री शंकरराव पाटील यांनी सांगितले. 150 रुपयांत शासकीय झोपडी बारामती – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 150 रुपयांत शेतमजुरांसाठी झोपडी कशी असावी याचा नमुना बारामती तहसीलदार कचेरीत प्रत्यक्ष झोपडी बांधून ठेवलेला आहे. ती झोपडी फारच चांगली आहे. सदरच्या झोपडीस एक खिडकी व दार आहे. अनेक शेतमजूर व शेतकरी सदरची झोपडी पाहून समाधान व्यक्त करत आहे.