बांगलादेशाला कडक शब्दांत जाणीव दिली नवी दिल्ली, दि. 14 – सीमा पार करून फराक्का धरण उडविण्याच्या वल्गना करणाऱ्या बांगलादेशातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आज भारत सरकारने कडक इशारा दिला आहे. बांगलादेशाचे कमिशनर शमसूर रहमान यांना विदेश कचेरीत बोलावून सांगण्यात आले की, बांगलादेश सरकार फराक्का विरोधी प्रचार रोखू शकत नाही, याचा खेद व चिंता वाटत आहे. दोन्ही देशातील संबंध चांगले राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याच्या घोषणेविरुद्ध बांगलादेश सरकारने ताबडतोबीने काही उपाययोजना करायला पाहिजेत. मराठी रंगभूमी नव्या फॉर्मच्या शोधात आहे पुणे – आजची मराठी रंगभूमी केवळ नवीन दिशेच्या शोधात नसून, ती नवीन फॉर्मच्या शोधात आहे, असे मत सुप्रसिद्ध नाट्य-समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मांडले. आधुनिक नाटकाचे जनक किर्लोस्कर यांच्यापासून देवल, खाडिलकर, गडकरी आदी नाटककारांनी नाट्य रचनेत थोडा थोडा बदल केला आहे. नवीन रंगभूमीचे दोन प्रकार आहेत व्यावसायिक व प्रायोगिक. कालच्या प्रायोगिक रंगभूमीवरचे नट आज व्यावसायिक रंगभूमीवर काम करीत आहेत. तमाशा हा आपल्याकडील खरा “फॉर्म’ आहे. नवीन नाटककार नव्या फॉर्मच्या शोधात आहेत.