लांब पल्ल्याच्या गाड्या आता “जनता गाड्या’ नवी दिल्ली, दि. 11 – अंदाजपत्रक सादर करताना रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केली की, यापुढे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या या “जनता गाड्या’ असतील. रेल्वेमंत्री मधू दंडवते म्हणाले की, लांब पल्ल्याच्या गाड्यांतील गर्दी कमी करण्यासाठी काही विशिष्ट मार्गावर दुमजली गाड्या सुरू करण्याचा विचार रेल्वे करीत आहे. दक्षिणेकडील राज्यांना जोडणारी पश्चिम किनारा कोकण रेल्वे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा विस्तार करण्यात येणार आहे. वाटव्यांचे गाणे हृदयाला जाऊन भिडते पुणे – निसर्गदत्त देणगी लाभलेला गळा, आवाजातील आर्जव यामुळे वाटव्यांचे गाणे सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडले. त्यामुळे माजघरातील मंद दिव्याप्रमाणे आपुलकीचे लेणे त्यांच्या गाण्याला लाभले, असे गौरवपर उद्गार पु. ल. देशपांडे यांनी काढले. भावगीत गायक गजाननराव वाटवे यांच्याबाबत पुल बोलत होते. श्रेष्ठ संगीताचे निकर्ष बाजूस ठेवून गाण्यातून लोकांना काय सांगावयाचे ही कला वाटव्यांनी उत्तम साधली आहे.