प्रभात वृत्तसेवा पिंपरी – दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यात रणकंदन माजवले आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल ४६ हजार ३३२ दुबार मतदार असून यादीमध्ये तब्बल ९२ हजार ६६४ नावे मतदारयादीमध्ये आली असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतून समोर आले आहे. निवडणूक विभागाने गुरूवारी (दि. २०) प्रभागानुसार मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. त्यानुसार शहरामध्ये १७ लाख १३ हजार ८९१ मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांनाच महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला तयारी करण्याबाबतचा कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार, शहरातील ३२ प्रभागांची अंतिम प्रभागरचना झाली आहे. तसेच आरक्षण सोडत देखील काढण्यात आली आहे. शहरामध्ये चार सदस्यीय ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यासाठी शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची यादी प्रभागानुसार फोडण्यात आली आहे. यामध्ये सर्वच प्रभागांमध्ये दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. दुबार मतदारांनी एक पेक्षा जास्त ठिकाणी मतदान करू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्यांचे नाव दोनदा किंवा जास्त वेळा आले आहे, त्यांच्या नावासमोर दोन स्टार देण्यात आले आहेत. यामुळे दुबार मतदारांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. तसेच त्यांच्याकडून ते कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत, याबाबत हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. त्यामुळे एकपेक्षा अधिक ठिकाणी मतदान होणार नसल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे. कशी करणार पडताळणी? ही यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदारसंघातील, एका प्रभागातील एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार तसा अर्ज भरून घेतला जाईल. अन्य ठिकाणी त्यांचे नाव असेल तर त्यापुढे स्टारचे चिन्ह असेल. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना हा दुबार मतदार असल्याचे लक्षात येईल. १) दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रभागांच्या मतदार यादीत नाव असेल तर एका प्रभागाची निवड २) एकाच प्रभागात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल, तर एका केंद्राची निवड. ३) मतदार मतदानासाठी आला, तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले जाईल. “दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्यात येणार आहे. तसेच यादीमध्ये दुबार मतदारांपुढे स्टार असणार आहे. त्यामुळे पोलिंग एजंट, मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी यांचे देखील दुबार मतदारांवर लक्ष असणार आहे.” – सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग.