महाराष्ट्रात होणार 45 हजार कोटींची गुंतवणूक, 10 हजार जणांना मिळणार रोजगार – उदय सामंत

मुंबई – स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात सुमारे 45,900 कोटी रुपयांच्या गुंतणुकीचे करार झाले आहेत अशी माहिती असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यातील किमान 10,000 लोकांना थेट रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावाही सामंत यांनी केला आहे.
“वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दावोस येथे दाखल झाले असून त्यांनी तेथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले आहे. महत्त्वाच्या उद्योगांशीही येथे सामंजस्य करार केले जातील, असे सावंत म्हणाले.
राज्यांतील गुंतवणूक करारांवर मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या व्यतिरिक्त प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दावोस येथील ही परिषद 20 जानेवारी पर्यंत चालणार आहे.





