धनकवडी – विधानसभा निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होत असताना बनावट, बाद , नोटा, टपाली, गृह मतदान याची आकडेवारी समोर येवू लागली आहे. नवमतदार तसेच काहींच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघात ७५ जणांनी बनावट (फेक) मतदान केल्याचे तर ५३ मतदारांचे मतदान बाद करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विधानसभा निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणू आयोगाकडून विविध योजना राबविण्यात आल्या. त्यानुसार निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी मतदारांना तसेच ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार याशिवाय लष्करी जवानांना टपाली मतदानाचा अधिकार देण्यात आला होता त्यानुसार खडकवासला मतदारसंघात ८२० टपाली मतदान झाले त्यापैकी ५३ मतपत्रिका बाद करण्यात आल्या. १७ ब क्रमांक अर्जाचा वापर…. मतदान केंद्रावर एकाच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी मतदान केल्याचे आढळून आल्यास संबंधित मतदारांस त्याचा मतदानाचा अधिकार बजावता येतो. याकरिता निवडणूक अधिकाऱ्याकडे १७ ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करून मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र, निकालावर परिणाम करण्याएवढी अल्प तफावत असल्यास हे मतदान विचारात घेऊन मतांची मोजणी करण्यात येते. … असे प्रकार घडलेच मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. खडकवासला मतदार संघात मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका तशाच राहिलेल्या होत्या. जिवंत असलेले मयत तर मयतांची नाव मतदान याद्यांमध्ये होती. मतदान कार्ड असताना यादीत नसल्याचे प्रकारही समोर आले. याच कारणातून काहींना मतदान करता आले नाही. याची संख्या अधिक नसली तरी मतदार संघाचा विचार करता या मतदांचा परिणाम निश्चीत जाणवण्याएवढा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.