इस्लामाबाद – खैबर पख्तुनवा प्रांतात एका इस्लामिक धार्मिक नेत्याच्या नेतृत्वाखालील जमावाने तेथील एक हिंदु मंदिर पाडण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकरणात तेथे गेल्या दोन दिवसांत आणखी 45 जणांना अटक करण्यात आली असून त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 100 झाली आहे. या प्रकरणी जो गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यात 350 जणांची नावे नोंदवण्यात आली आहेत. बाकीचे आरोपीही लवकरच अटक केले जातील असे तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
करक जिल्ह्यातील टेरी येथे हे मंदिर पाडण्याचा प्रकार घडला होता. या मंदिराचे विस्तारीकरण करण्यात येत होते. त्याला विरोध करीत जमावाने या मंदिरावरच हल्ला करून ते पेटवूनही दिले होते. दहशतवाद विरोधी कायद्यान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दहशतवाद विरोधी न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या मंदिरात एका हिंदु धार्मिक व्यक्तिची समाधीही आहे. हे मंदिर बरेच जुने आहे. त्याच्या नुतनीकरण आणि विस्ताराची रितसर कायदेशीर अनुमतीही घेण्यात आली होती. पण हे विस्तारीकरण करण्यास तेथील कट्टरपंथीयांचा विरोध होता. त्यातून मंदिरावर हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. भारत सरकारनेही या प्रकरणात पाकिस्तान सरकारकडे निषेध नोंदवून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. हे मंदिर पुन्हा शक्य तितक्या लवकर उभारण्याची ग्वाही तेथील प्रांतिक सरकारने दिली आहे.