अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 45 लाखांची नुकसानभरपाई

पुणे – पहिल्यांदा कारची दुचाकीला धडक, त्यानंतर पीएमपीएल बस अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या खासगी ठेकेदाराच्या कुटुंबियांना 45 लाख 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य आर.एम.पांडे यांनी दिला आहे. दावा दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजेच 24 एप्रिल 2017 पासून त्यावर 9 टक्के वार्षिक दराने व्याज देण्यात यावे, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

याबाबत खासगी ठेकेदाराच्या कुटुंबियांनी ऍड. रामदास कुटे यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. पीएमपीएमएल, बसचा मालक, बसची विमा कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, कारचा मालक आणि कारची विमा कंपनी रॉयल सुंदर जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला होता. संबंधित 53 वर्षीय ठेकेदार 6 नोव्हेंबर 2011 रोजी दुचाकीवरून कोथरूडकडून वारजेकडे चालले होते. त्यावेळी कोथरूड, वनदेवी मंदिराच्या समोर पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ते उजव्या बाजूला पडले. त्यावेळी पीएमपीएल बस त्यांच्या अंगावरून गेली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर पत्नी, 27, 23 आणि 15 वर्षाची मुले आणि 75 वर्षीय आईने ऍड. रामदास कुटे यांच्यामार्फत दावा दाखल केला. दाव्याच्या सुनावणी दरम्यान त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. ते आयकर विवरण भरत होते. त्यावरून त्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख 42 हजार 199 रुपये होते. भविष्यातील उत्पन्न, अवलंबून असलेल्या व्यक्तीचा विचार करून 60 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.