Passenger Vehicle Sales: सरलेल्या वर्षात 43 लाख प्रवासी वाहनांची विक्री

नवी दिल्ली – काही महिन्यापासून वाहन विक्रीवर परिणाम झाला असला तरी सरलेल्या संपूर्ण वर्षांमध्ये तब्बल 43 लाख घाऊक प्रवासी वाहन विक्री झाली. गेल्या वर्षी 41.10 लाख प्रवासी वाहन विक्री झाली होती. यामध्ये जवळजवळ साडेचार टक्के वाढ झाली आहे, असे वाहन उद्योगाकडून सांगण्यात आले.
या सकारात्मक आकडेवारीचा शेअर बाजारावरही गुरुवारी सकारात्मक परिणाम झाला आणि तेजीचे नेतृत्व वाहन कंपन्यांनी केले. मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटार, किया इंडीया या सर्वच कंपन्यांनी सरलेल्या वर्षांमध्ये विक्रमी वाहन विक्री केली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरपर्यंत वाहन विक्री फारसे वाढत नव्हती. मात्र डिसेंबर महिन्यात वाहन विक्री वाढल्याचे आकडेवारी बुधवारी जाहीर झाली होती.
या आकडेवारी बद्दल समाधान व्यक्त करताना मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थिव बॅनर्जी यांनी सांगितले की, मारुती सुझुकी कंपनीच्या विक्रीत सरलेल्या वर्षात वाढ होऊन ही विक्री 17,90,977 युनिट झाली आहे. जी की करोनापूर्वी म्हणजे 2018 मध्ये 17,51,919 युनिट होती. त्याच प्रमाणात कंपनीची किरकोळ विक्री वाढली आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, सरलेल्या वर्षाप्रमाणेच आगामी काळातही एकूण वाहन विक्री वाढून 43 लाख युनिट पर्यंत होण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षापासून टाटा मोटर्सची विक्री एकतर्फी वाढत आहे. 2024 मध्ये टाटा मोटर्सची झालेली विक्री विक्रमी आहे. डिसेंबर महिन्यातही टाटा मोटर्सच्या विक्रीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनीने 2024 मध्ये 3,26,329 वाहने विकली. गेल्या वर्षी या कंपनीने 2,33,346 वाहने विकली होती. म्हणजे एका वर्षात या कंपनीची वाहन वाहन विक्री 40% वाढली आहे. आमच्या एसयूव्ही वाहनांना मागणी कायम आहे असे कंपनीचे उपाध्यक्ष शबरी मनोहर यांनी सांगितले.
किया इंडिया मोटार कंपनीचे उपाध्यक्ष हार्दिक सिंह ब्रार यांनी सांगितले की, सरलेल्या वर्षात आमच्या विक्रीत सहा टक्के वाढ होऊन 2,55,038 युनिट विक्री झाली आहे. देशातील सर्व राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून आगामी वर्षात आमची विक्री अपेक्षा जास्त प्रमाणात वाढण्याबाबत आम्हाला खात्री आहे.
ग्रामीण भागातून मागणी वाढली –
मारुती सुझुकीने जारी केलेल्या माहितीनुसार सरलेल्या वर्षात आणि डिसेंबर महिन्यामध्ये ग्रामीण भागातून मागणी वाढल्यामुळे वाहन कंपन्यांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीत वाढ होण्यास मदत झाली असल्याचे दिसून येते. डिसेंबर महिन्यामध्ये मारुती सुझुकीची ग्रामीण भागामध्ये 16 टक्के जास्त वाहन विकली. संपूर्ण तिसर्या तिमाहित ग्रामीण भागातून चांगली मागणी आल्यामुळे कंपनीची आकडेवारी सकारात्मक आहे चांगला पाऊस आणि कृषी उत्पादनांना चांगला भाव यामुळे ग्रामीण भागातून मागणी वाढली आहे.



