बारामतीतील 42 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार?

काऱ्हाटी – बाबुर्डी (ता. बारामती) येथे बारामती तालुक्‍यातील 42 गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

बारामती तालुक्‍यातील सुपा परगणा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी चार पिढ्यांपासून हाल सोसले आहेत. आजपर्यंत सर्वच पक्षांचे सरकार आले आणि गेले. परंतु, येथील पाण्याचा प्रश्‍न कोणत्याही सरकारला सोडविता आलेला नाही. याच कारणातून सुपे परिसरातील शेतकरी पेटून उठला आहे. यानुसार विधानसभा निवडुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासंदर्भात बाबुर्डी (ता. बारामती) येथील भैरवनाथ मंदिरात बैठक घेण्यात आली.

यावेळी गुंजवणी धरणातून नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी सोडावे किंवा जानाई उपसा सिंचन योजनेतून खोद चारीने पाणी सोडावे अशी मागणी करीत एकीकडे धरणे शंभर टक्के भरली असताना दुसरीकडे पिके जळून चालली असली तरी सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय 42 गावांनी घेतला आहे. पाणी मिळेपर्यंत या गावातील शेतकरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठीचा लढा अखंड चालू ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार केला आहे. याकरिता कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता ही लढाई लढण्याचा महत्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यावेळी बारामती तालुक्‍यातील देऊळगाव, काऱ्हाटी, जळगाव कप, जळगाव सुपे, माळवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी, पठारे वस्ती, सायंबाचीवाडी, लोणी भापकर, सुपे परिसरातील शेतकऱ्यांसह के.के. वाबळे, त्रिंबक चांदगुडे, के.एस.लोणकर, महादेव खंडाळे, मनोहर भापकर, नितीन लडकत, अशोक कोकणे, गणेश खोमणे, तानाजी रसाळ, वसंत ढोपरे, नारायण ढोपरे, महेश ढोपरे, राजेंद्र भोंडवे, राजेंद्र रसाळ उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×