वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय वडगांव मावळ येथे आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात तब्बल ४ हजार १८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून याद्वारे विविध संस्थांची एकूण ६ कोटी ४३ लाख ९७ हजार ४०६ रूपयांची विक्रमी वसुली झाली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. के. अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोकन्यायालय पार पडले. लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली विविध संस्थांची मोटार वाहन कायद्यांतर्गत येणारी नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विविध बँकांची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, एम.एस.ई.बी. आणि दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवसभरात ४ हजार १८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी अंती तब्बल ६ कोटी ४३ लाख ९७ हजार ४०६ रूपयांची वसुली झाली. सदर लोकन्यायालयात पॅनल प्रमुख म्हणुन अति जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. के. अनभुले, दिवाणी न्यायाधीश आर.ए. शिंदे, न्यायाधीश एस.बी. काळे, न्यायाधीश एस.पी. जाधव, न्यायाधीश व्ही. आर. डोईफोडे, न्यायाधीश एस.ए. माळी, न्यायाधीश ए. एस. अग्रवाल यांनी काम पाहिले. पॅनल जज म्हणून ॲड. एम.एम. खांदवे, ॲड सी.एस. जाधव, ॲड. आर.एस. नाणेकर, ॲड. डी.व्ही. वाकडे, ॲड. जी.एस. दाभाडे, ॲड. एस.एस. तिखे आणि ॲड. एच.डि. वाडेकर यांनी काम पाहिले. यासह वडगांव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय वांद्रे आणि अन्य पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार, न्यायिक कर्मचाऱ्यांचे सहकार्य झाले.