मॉस्को – रशियातील मॉस्को विमानतळावर काल एका प्रवासी विमानाला इमर्जन्सि लॅंडिंग करावे लागले. हे विमान धावपट्टीवर उतरताच विमानाने अचानक पेट घेतला त्यात किमान 41 प्रवासी दगावल्याचे वृत्त आहे. या प्रवासी विमानात एकूण 78 प्रवासी होते. हे विमान मॉस्कोहून मुरमान्सक कडे जाण्यास निघाले होते त्यावेळी ही दुर्घटना घडली. सदैवाने एकूण 37 प्रवासी वाचले आहेत. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. पंतप्रधान मेदवेदेव यांनी या चौकशी साठी एक विशेष समिती स्थापन केली आहे.
काल सायंकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी या विमानाने आपल्या नियोजित ठिकाणाच्या दिशेने उड्डाण केले. पण थोड्याचवेळात विमानात काही गडबड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने नियंत्रण कक्षाकडे इमर्जन्सी लॅंडिंगची अनुमती मागितली. या घटनेच्या संबंधात एका प्रवाशाने सांगितले की उड्डाण केल्यानंतर लगेच विमानाला वीजेचा धक्का बसावा तसा प्रकार घडला आणि विमान पुन्हा माघारी परतले पण विमानाचे लॅंडिंगही सुरळीत झाले नाही. आणि त्यानंतर लगेच विमानाने पेट घेतला. या प्रकारामुळे मॉस्को विमानतळावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मॉस्कोकडे येणारी बरीच विमाने अन्यत्र वळवण्यात आली.