काश्मीरमधील चकमकीत तोयबाचे 4 दहशतवादी ठार; 3 जवानांचा अपघाती मृत्यू

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य होते. दरम्यान, चकमकस्थळी जाताना तीन लष्करी जवानांचा अपघाती मृत्यू झाला.
शोपियॉं जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यामध्ये चार दहशतवादी मारले गेले.
ते शोपियॉं आणि पुलवामा जिल्ह्यात सक्रिय होते. परप्रांतीय कामगारांवरील हल्ल्यांत ते सामील होते. त्यामुळे त्यांचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.
दरम्यान, चकमकीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे अतिरिक्त बळ घटनास्थळी पाठवण्यात आले. चकमकस्थळी जात असताना लष्करी पथकातील एक वाहन रस्त्यावर उलटले. त्या अपघातात तीन जवान मृत्युमुखी पडले, तर पाच जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले.





