श्रीनगर – काश्मीरमधील दोन स्वतंत्र चकमकींत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. ती घडामोड पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेसाठी मोठा हादरा मानली जात आहे.
कुलगाम जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणी सुरक्षा जवान पोहचले. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. तारिक अहमद मिर आणि समीर भाई उर्फ उस्मान अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही जैशचे सदस्य होते.
उस्मान हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले. दुसरी चकमक पुलवामा जिल्ह्यात घडली. त्यामध्येही दोन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडील दोन एके रायफल्स जप्त करण्यात आल्या. एकाच दिवशी चार दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.
चालू वर्षी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांविरोधात अनेक धडक मोहिमा राबवल्या. त्यामध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेल्याने त्यांच्या संघटनांना जबर हादरे बसत आहेत.