Chandrapur Crime : धक्कादायक ! गाडीला कट लागल्याच्या वादातून तरुणाची हत्या

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 4अल्पवयीन तरुणांकडून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे दुचाकीने जाताना गाडीचा कट लागल्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आरोपींनी गाडीला कट लागल्यावर मृत तरुणाचा पाठलाग केला. यानंतर त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली. नुकसान भरपाई घेण्यासाठी गौतमनगर परिसरातून जात असताना त्यांचा वाद वाढल्याने या चौघांनी तरुणाला मारहाण करत त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह झुडुपात टाकून दिला आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
नुकसान भरपाई संदर्भात बातचीत करताना मयतने आपल्या भावाला या संपूर्ण प्रकरणाच्या घटनेची माहिती दिली होती. मात्र बराच वेळ मृतक तरुणाचा शोध न लागल्याने आणि मोबाईल ट्रेस न झाल्याने मृतकाच्या भावाने पोलीस तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी 16 ते 17 वर्षांच्या 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





