ताकवली येथील मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत

सातारा – सांडवली धबधब्यातून वाहून गेल्याने मृत पावलेल्या कृष्णा गणपत वायकर (वय 50) यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्यांनी वायकर यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदान मिळवून दिले.
कृष्णा वायकर हे दि. 27 जुलै रोजी बेपत्ता झाले होते. सांडवली धबधब्याचे पाणी ताकवली येथील ओढ्यात आले आणि ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्याने, त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
या मदतीचा धनादेश आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते वायकर यांच्या वारसांना देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, शशिकांत झगडे, तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत, भिकू भोसले, श्रीरंग देवरुखे, बाळासाहेब घोरपडे, शांताराम लोटेकर, अंकुश मोरे उपस्थित होते. आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल वायकर कुटुंबीयांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.





