सोमवारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत
पुणे – पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी झाली. यामध्ये पुणे मतदारसंघात 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर बारामती मतदारसंघातील 6 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात 43 उमेदवार तर बारामती मतदारसंघातून 25 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत (दि.8) आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर या दोन मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर बारामती मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये काही उमेदवारांनी दोन-तीन प्रतिंमध्ये उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. पुणे मतदारसंघात आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झाली. तर बारामती मतदारसंघातील उमेदवारांची अर्जांची छाननी विधानभवन येथे झाली.
या अर्जांच्या छाननीमध्ये प्रतिज्ञापत्र न सादर करणे, उमेदवारी अर्ज अपूर्ण असणे, तसेच डमी उमेदवार म्हणून अर्ज सादर करणे मात्र त्यासोबत संबंधित पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही, या कारणांमुळे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले.
पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत येत्या सोमवारपर्यंत दुपारी तीनपर्यंत आहे. त्यामुळे कोण-कोण उमेदवार रिंगणात रहाते, याकडे लक्ष लागले आहे.