प्रभात वृत्तसेवा पुणे – गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यूडायस-प्लसवरील ३० सप्टेंबरपर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व श्रेणींतील ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झालेली नाही. आठ हजार शाळांची पटसंख्या दहापेक्षा असल्याचेही आढळले आहे. एवढेच नव्हे तर शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात ३७ शाळा विनाविद्यार्थी असल्याचे दिसते. राज्यात एकूण २ कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सात हजारांनी अधिक आहे. मात्र पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या लाखोंनी वाढली तरी ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती चिंताजनक आहे.यूडायस-प्लसवरील आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक ३७ शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद नाही. रत्नागिरीतील २४, नागपूरमधील २३ शाळाही विद्यार्थ्यां विना आहेत. बुलढाण्यात २१ शाळांत शून्य पटसंख्या आहे. या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ७१३ शाळांची पटसंख्या १० च्या खाली आहे. पुण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२, तर सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे.मुंबई उपनगरांतील ३६०, मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९ आणि पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या १०च्या खालीच आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०० ते ३००, तर काही ठिकाणी १०० ते १५० शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण ७ हजार ९४६ शाळांत केवळ १ ते दहा विद्यार्थी नोंदले गेले आहेत. जिल्ह्यानिहाय स्थानिक परिस्थिती आणि अन्य माध्यमांच्या शाळांमुळे ग्रामीण भाग, दुर्गम व डोंगराळ भागातील अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या बिकट असल्याचे दिसते.