Satara: जिल्ह्यात चार वर्षात रोखले 39 बालविवाह
Satara बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. लैंगिक असमानता, शिक्षणाचा अभाव, रुढी- परंपरा आणि मुलींना आर्थिक ओझे मानण्याची मानसिकता आहे. 21 व्या शतकात देश प्रगतीची उड्डाणे घेत असला, तरी देशातील विविध जिल्ह्यांतील बालविवाह प्रथा रोखण्यात अजूनही यंत्रणेला म्हणावे तसे यश आलेले नाही.

Satara: जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन यांच्याकडून 2023 ते 2026 या चार वर्षात 39 बालविवाह रोखण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली.
बालविवाह ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. लैंगिक असमानता, शिक्षणाचा अभाव, रुढी- परंपरा आणि मुलींना आर्थिक ओझे मानण्याची मानसिकता आहे. 21 व्या शतकात देश प्रगतीची उड्डाणे घेत असला, तरी देशातील विविध जिल्ह्यांतील बालविवाह प्रथा रोखण्यात अजूनही यंत्रणेला म्हणावे तसे यश आलेले नाही. मागील चार वर्षात सातारा जिल्ह्यात 39 बालविवाहाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यातील 9 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात 11 तालुक्यांत ग्राम बालसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
समित्यांनी जनजागृतीद्वारे बालविवाह रोखावे हा या समित्यांना प्रशिक्षणामागील उद्देश आहे. समित्यांद्वारे बालविवाह, बालकामगार, बालशोषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. सरकारने 1098 ही हेल्पलाईन ही सूरु केली आहे. बालविवाह होत असल्यास त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. यामुळे या हेल्पलाईनवर अनेक जण फोन करुन बालविवाहाची माहिती देतात. बालविवाहामुळे कमी वयात गरोदरपणामुळे बाळंतपणात मुलींचा मृत्यू होण्याचा धोका खूप जास्त असतो. विवाहानंतर मुलींचे शिक्षण कायमचे थांबते. लहान वयात कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्यामुळे मुली तीव्र नैराश्य आणि मानसिक तणावाखाली जगतात. खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात लग्न झाल्यामुळे त्यांचे बालपण हिरावून घेतले जाते.





