पणजी – कधीही हार मानू नये ही वृत्ती ठेवली तर यश निश्चितपणे मिळते असे आपण नेहमी म्हणत असतो. याचाच प्रत्यय घडवत महाराष्ट्राच्या मानसी मोहितेने ट्रायथलॉनमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. याचप्रमाणे संजना जोशीने रौप्यपदक जिंकले. ट्रायथलॉनमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने दोन पदके पटकावली.
ट्रायथलॉनमध्ये पोहताना जेली फिशने तिच्या पायाच्या चावा घेतला. (Maharashtra’s Mansi Mohite braves jellyfish bite to clinch triathlon gold in 37th National Games) मात्र तरीही तिने पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तिन्ही शर्यती यशस्वीपणे पूर्ण करीत महाराष्ट्राला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत तिची सहकारी संजना जोशी ही रौप्यपदकाची मानकरी ठरली.
पणजी येथील समुद्रकिनारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 750 मीटर्स पोहणे, त्यानंतर 20 किलोमीटर सायकलिंग व नंतर पाच किलोमीटर धावणे अशा शर्यतींचा त्यामध्ये समावेश होता. पोहत असतानाच मानसीच्या पायांना जेली फिश चावले. मात्र हे होऊनही या वेदना सहन करीत तिने 750 मीटर्स पोहणे शर्यत 13 मिनिटे, 14 सेकंदात, त्यानंतर 20 किलोमीटर सायकलिंग 36 मिनिटे 44 सेकंदात व नंतर पाच किलोमीटर धावण्याची शर्यत 22 मिनिटे 28 सेकंदात पूर्ण केली आणि सुवर्णपदक जिंकले. संजनाने 750 मीटर्स पोहणे शर्यत 13 मिनिटे, 09 सेकंदात, त्यानंतर 20 किलोमीटर सायकलिंग 35 मिनिटे 54 सेकंदात व नंतर पाच किलोमीटर धावणे शर्यत 26 मिनिटे 14 सेकंदात पूर्ण केली आणि रुपेरी कामगिरी केली.
#CWC2023 #INDvSA : अखेर प्रतीक्षा संपली, वाढदिवशी विराटनं केली सचिनच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी…
या स्पर्धेमध्ये गुजरातच्या प्रज्ञा कुमारीला अगोदर रजतपदक जाहीर करण्यात आले होते. मात्र सायकलींच्या वेळी तिचे पॅडल निघाल्यानंतर तिने स्वतः ते बसवण्याऐवजी वडिलांनी तिला ते बसवून दिले. सायकलीचा कुठलाही भाग तुटला तर तो पुन्हा बसवण्याची जबाबदारी संबंधित खेळाडूचीच असते. या संदर्भात महाराष्ट्रसह तीन-चार संघांनी आक्षेप घेतला आणि त्यांचा हा आक्षेप मान्य करण्यात आला. त्यामुळे प्रज्ञाला अपात्र ठरवण्यात आले आणि संजनाला रजतपदक बहाल करण्यात आले.
मानसीला ही स्पर्धा झाल्यानंतर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मानसी ही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असून तिने आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळवली आहेत.