घरफोडीचे गुन्हे उघड करत 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा – जिल्हयात घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार संजय अंकुश मदने (रा. वडूज ता. खटाव) याच्याकडून पोलिसांच्या चौकशीमध्ये सतरा घर फोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. 62 तोळे सोन्याचे दागिने व चार हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा 34 लाख 72 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घरफोड्या 2017 ते 2023 या सहा वर्षातील असल्याचे संबंधित आरोपीने कबूल केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समीर शेख यांनी सांगितले की, कोरेगाव तालुक्यातील एका चोरीच्या गुन्ह्यात संजय मदने याला अटक करून त्याच्याकडून तेरा लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान पोलीस अभिलेखा वरील असणाऱ्या मदने याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने वडूथ, बोरखळ, मालगाव ,जळगाव, तडवळे, खेड, नांदगिरी, चिमणगाव, देऊर, वाठार या गावांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली. मदने याची सातारा तालुका पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सातारा कोरेगाव आणि वाठार या तीन तालुक्यांमध्ये सतरा घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली.
त्याच्याकडून 62 तोळ्याचे दागिने आणि चार हजार रुपये किमतीची चांदीचे दागिने असा 34 लाख 72 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या सर्व घरफोडीच्या घटना 2017 ते 2022 या दरम्यानच्या आहेत मदने याच्या समावेत अन्य काही संशयित तपासाच्या कक्षेमध्ये असून ही एक मोठी टोळी असल्याचे पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले. मात्र तपासाचा भाग म्हणून पुढील तपशिलातील माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलिस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के ,अतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, मोहन पवार ,वैभव सावंत, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, केतन शिंदे, शिवाजी गुरव यांनी भाग घेतला.





