216 लाभार्थ्यांकडून 32 लाख 40 हजारांची वसुली

सातारा – अमृत महाआवास अभियानांतर्गत गरजूंना घरकुले देण्याचे अभियान शासनातर्फे सुरु आहे. घरकुल मंजूर होऊन अनुदान प्राप्त होऊनसुध्दा वर्षभरानंतरही 372 लाभार्थ्यांनी बांधकामे सुरू केली नसल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही लाभार्थींनी घरकुलाची कामे करण्यास अनुकुलता दर्शवली. मात्र, 216 लाभार्थ्यांनी घरकुलांची उभारणी केली नाही. अशा 216 लाभार्थींकडून जमा झालेला हप्ता 32 लाख 40 हजार रुपये वसूल करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आक्रमकता दाखवली होती. ज्या लाभार्थींनी घरकुल उभारणीबाबत अनुकुलता दर्शवली आहे ती घरकुले आता अन्य लाभार्थींना देण्यात येणार आहेत.
शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर जास्तीत जास्त गरजूंपर्यंत घरकुले मिळावीत तसेच घरकुलांचे बांधकाम वेळेत सुरू व्हावे, यासाठी अधिकारी, कर्मचारी पाठपुरावा करत असतात. गृहभेटी देऊन अडचणी समजावून घेत असतात. जागा नसलेल्या भूमिहीन, बेघर लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रशासनामार्फत सर्वच पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही घरकुले मंजूर होऊन देखील लाभार्थी वेळेत घरकुले बांधत नसल्याने पुढील पात्र लाभार्थींना शासनाकडून उद्दिष्ट मिळण्यास अडचणी येत होत्या.
या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर खिलारी यांनी आक्रमक भूमिका घेत गरजूंना गतीने घरकुले मिळण्याबाबत पुढाकार घेतला. घरकुल उभारणीबाबत जे लाभार्थी अनुकूल नाहीत. त्यांच्याकडून जमा झालेल्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या होत्या. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 203 आणि राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 169 असे मिळून सातारा जिल्ह्यात 372 लाभार्थ्यांनी निधी देऊन सुद्धा घरकुलांचे बांधकाम केले नव्हते. प्रथम टप्प्याची रक्कम पंधरा हजार रुपये प्रति लाभार्थी असे 372 लाभार्थ्यांना 56 लाख 25 हजार अनुदान वितरित करण्यात आले होते. मंजूर घरकुलांचे बांधकाम विहित कालावधीत सुरू करणे अपेक्षित होते. परंतु, वर्षभराच्या कालावधीत बांधकाम सुरू न केल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर काही लाभार्थींनी घरकुले बांधकामास सुरुवात केली. मात्र, 216 लाभार्थींनी घरकुलांची उभारणीच केली नाही.





