बारामती – महावितरणच्या ‘लकी डिजीटल ग्राहक योजना’ अंतर्गत बारामती परिमंडलातील ३०५ वीजग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच बक्षिस म्हणून मिळाले. ऑनलाइन वीजबिल भरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेची पहिली सोडत ७ एप्रिल रोजी जाहीर झाली. बारामती मंडलातील १२ उपविभागांमधून १२ ग्राहकांना प्रथम क्रमांकासाठी स्मार्टफोन, २४ जणांना दुसऱ्या क्रमांकासाठी स्मार्टफोन आणि २४ जणांना तिसऱ्या क्रमांकासाठी स्मार्टवॉच अशी एकूण ६० बक्षिसे देण्यात आली. पुढील सोडत ७ मे रोजी होणार आहे. ही योजना १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सुरू असून, सलग तीन किंवा अधिक वीजबिले ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांना लाभ मिळेल. बारामती मंडलात ७८% ग्राहक ऑनलाइन बिल भरणा करतात. मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी सांगितले की, www.mahadiscom.in आणि महावितरण ॲपद्वारे २४ तास सुविधा उपलब्ध आहे. तसेच, ०.२५% डिजीटल भरणा सूटही मिळते. नेट बँकिंग, यूपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड आदी पर्यायांनी बिल भरणाऱ्यांना बक्षिसाची संधी आहे. ग्राहकांनी डिजीटल पद्धतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पेठकर यांनी केले.