IndiGo flights cancelled – भारतातील मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा सामना करावा लागला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवर 300 उड्डाणे रद्द करण्यात आल्याने विमानतळाची स्थिती रेल्वे स्टेशनसारखी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीतील इंडिगोचे 30 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करणयत आली. त्यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हैदराबादमधीलही 30 विमाने रद्द करण्यात आली आहेत. देशभरातील सुमारे 170 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी मंगळवारी व बुधवारी देखील इंडिगोची सुमारे 200 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणे अनेक तासांच्या उशीराने देखील होत असल्याने, प्रवाशांच्या गैरसोईत मोठी वाढ झाली आहे. इंडिगो एअरलाइन्स दररोज सुमारे 2,300 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. इंडिगोने प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापासाठी बुधवारी माफी मागितली होती तसेच शुक्रवारपर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. बुधवारी दिलेल्या निवेदनात, एअरलाइनने, किरकोळ तांत्रिक बिघाड, हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल, खराब हवामान, मंद विमान वाहतूक नेटवर्क आणि क्रू शिफ्ट चार्ट (फ्लाइट ड्युटी टाइम मर्यादा) शी संबंधित नवीन नियमांचे पालन यामुळे त्यांच्या सेवांवर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे मान्य केले आहे. तसेच पुढील 48 तासांमध्ये सेवा पूर्ववत होईल अशी आशा देखील व्यक्त केली आहे.