Satara | फलटणमधील ३० वर्षांच्या एकहाती सत्तेला लगाम

फलटण,- लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुसऱ्या दिवसापासून त्यांनी केलेल्या विकासकामावर फोकस करत कार्यकर्त्यांचे वाढविलेले मनोबल आणि घेतलेली मेहनत याचे फळ विधानसभा निवडणुकीत सचिन पाटील आमदार झाल्याचे रुपाने मिळाले आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघात सलग ३० वर्षे एकहाती सत्ता असलेल्या राजे बंधूंना विधानसभा निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला असून सलग चौथ्यांदा एकाच व्यक्तीला दिलेली उमेदवारी, ऐनवेळी बदललेला पक्ष, केलेली विकासकामे प्रभावीपणे मांडण्यात आलेले अपयश आणि अतिआत्मविश्वास यामुळे राजे गटावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ फलटण तालुक्यावर विधान परिषद माजी सभापती व विद्यमान सदस्य आ. रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता आहे. या सत्तेला अनेक वेळा छेद देण्याचा विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरलेला होता, सलग ६ टर्म विधानसभा राजे गटाकडे आहे, मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत काही निर्णय चुकल्याने अपयश पदरी आले व पहिल्यांदाच विधानसभेला पराभूत होण्याची नामुष्की सत्ताधारी राजे गटावर आली आहे.
आ. रामराजे नाईक निंबाळकर हे कायम शरद पवार व अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विविध मंत्रिपदे व विधान परिषद सभापतीपद मिळविले, मात्र दीड वर्षांपूर्वी अचानक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीत अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचानक घेतल्याने कार्यकर्तेही अचंबित झाले, तथापि नेत्यांचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि काही कालावधीनंतर लोकसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीमध्ये असतानाही महायुतीचे उमेदवार व त्यांचे पारंपारिक विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना साथ न देता त्यांना पराभूत करण्यासाठी आ. रामराजे निंबाळकर ताकद लावली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यात निर्णायक भूमिका बजावली.
लोकसभा निवडणुकीत असलेल्या वातावरणाचा फायदा विधानसभेला पण होईल अशा अपेक्षेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यमान आ. दिपकराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करुन सुद्धा ती उमेदवारी धुडकावून खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आ. दीपकराव चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे लोकसभा निवडणुकीपासून तेथेच होते. त्यानंतर खा. शरद पवार यांच्याकडून दीपकराव चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळवून देण्यात आ. रामराजे यशस्वी झाले. फलटण तालुक्याच्या इतिहासात आत्तापर्यंत कधीही चौथ्यांदा आमदार विजयी झालेला नाही तरी सुद्धा आ. दिपकराव चव्हाण यांच्यावर विश्वास व्यक्त करुन त्यांना उमेदवारी देण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या रामराजे नाईक निंबाळकर जाहीर प्रचारात सहभागी झाले नाहीत मात्र त्यांचे सन आणि सैनिक, भावंडासह विधानसभा निवडणुकीत लढले.
आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठ्या परिश्रमाने निरा – देवघर धरणाची निर्मिती केली कालव्यांची कामे करुन पाणी खंडाळा तालुक्यापर्यंत आणले तसेच धोम – बोलकवडीचे पाणी सुद्धा आणले. हे पाणी ज्या परिस्थितीत आणले ती परिस्थिती कशी होती याचे सविस्तर विवेचन राजे गटाला करता आले नाही. कमिन्स प्रमाणेच श्रीराम कारखान्याबाबत झालेले आरोप त्यांना प्रभावीपणे खोडून काढता आले नाहीत. गेल्या ३० वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात विविध विकास कामासाठी निधी आणला गेला मात्र आज तालुक्यातील रस्त्यांची व आरोग्य सुविधांची दुरवस्था पाहता हा निधी कमी पडला की यामध्ये नेमक्या काय अडचणी आल्या यावर विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देणे राजे गटाला जमले नाही.
सोडून जाणाऱ्यांवरील टीका आवडली नाही
गेले पंचवीस ते तीस वर्ष त्यांच्या बरोबर असणारे काही नेते मंडळी विरोधकांच्या गोटात सामील होताच त्यांच्यावर केलेली टीकाटिप्पणी त्या त्या गावातील ग्रामस्थांना पटली नाही. फलटणकरांचे स्वप्न असलेल्या लोणंद-फलटण-बारामती रेल्वे संदर्भात केलेली टिका टिप्पणी लोकांना आवडली नाही. गेल्या ३० वर्षाच्या एकतर्फी राजकारणामुळे काही कार्यकर्ते सुस्तावले गेले होते. तसेच अनेक लाभार्थ्यांना राजेबंधूनी मोठे केले मात्र त्यातील बऱ्याच जणांनी विधानसभेला कामच केले नाही. राजे गटाने काही जणांकडे विविध कामांसाठी जबाबदारी सोपवलेली आहे मात्र त्यांचे वागणे बोलणे त्यांच्याकडे कामासाठी जाणाऱ्या लोकांना पटलेले नाही.
रणजितसिंह यांनी संयमाने विकास लोकांसमोर ठेवला
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या विविध प्रचार सभांमध्ये गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या विकास कामावर प्रामुख्याने फोकस केला, लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कार्यकर्त्यांचे वाढविलेले मनोबल, आ. सचिन पाटील यांना विधानसभेला निवडून आणण्यासाठी घेतलेली मेहनत व त्यानंतर बाळगलेला संयम याचे फळ त्यांना विधानसभा निवडणूकीत मिळाले आहे.





