“डब्लूएचओ’ला चीनकडून 30 दशलक्ष डॉलरचे अनुदान

बीजिंग : चीनने गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेला आणखी 30 दशलक्ष डॉलर अनुदान जाहीर केले, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या जागतिक पातळीवरच्या उपाय योजनांचा भाग म्हणून हे अनुदात “डब्लूएचओ’ला दिले जाणार आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे अर्थसहाय्य बंद करण्याबाबत चीनने तीव्र चिंताही व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
चीनने यापूर्वीच “डब्लूएचओ’ला 20 दशलक्ष डॉलरचे अनुदान दिले आहे. आज जाहीर झालेले रोख 30 दशलक्ष डॉलरचे अनुदात हे त्याव्यतिरिक्त असणार आहे. हे अनुदान विकसनशील देशांमधील आरोग्य सुविधा आणि “कोविड-19’च्या प्रतिसादाच्या उपाय योजनांसाठी दिली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाच्या शुल्काव्यतिरिक्त ही रक्कम असेल, असे गेंग यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेला आणि संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस ऍधानोम घेब्रेयसिस यांना चीनचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही गेंग यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्या आक्षेप आणि टीकेचा उल्लेख करणेही टाळले.





