आरोग्य सुविधांसाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव

सातारा -जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य उपक्रम आणि सुविधांकरिता खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. त्यांच्याकडे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या भेटीबाबतची माहिती जलमंदिरातून पत्रकाद्वारे कळविण्यात आली. त्यानुसार राज्य शासनाकडून केंद्राकडे शिफारस झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या पाच प्रस्तावांपैकी एक प्रस्ताव केंद्राकडे मंजूर करण्यात आले.
उर्वरित चार कामांची मंजुरी प्रलंबित आहे. यामध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांचे एमसीएच अंर्तगत इमारत बांधकाम करणे, पाटण तालुक्यातील सणबूर गावात आरोग्य विभागाची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान नूतनीकरण, वडगाव हवेली येथील तीन कोटी रुपयांचे आरोग्य केंद्र, कर्मचारी निवासस्थान बांधकाम व फलटण तालुक्यातील ताथवडे येथे तीन कोटी 65 लाखांची आरोग्य केंद्र कर्मचारी निवासस्थान बांधकाम, महाबळेश्वर येथील साडेचार कोटी रुपयांचे आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण केंद्र अशी 51 कोटी 35 लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली होती.
राज्य शासनाकडूनही ही कामे केंद्राकडे शिफारशीसह मंजुरीकरता पाठवण्यात आली आहेत. पैकी कराड येथील 33 कोटी 76 लाख रुपयांच्या कामाला केंद्राने मंजुरी दिली आहे. अद्यापही 17 कोटी 59 लाखाच्या कामांना मंजुरी मिळालेली नाही, ही बाब उदयनराजे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबतचा 30 कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव यावेळी सादर केला. जिल्ह्यातील पाच आरोग्य प्रस्तावांचे 17 कोटी व कर्मचारी निवासस्थानासाठी 30 कोटी अशा 47 कोटी 59 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती उदयनराजे यांनी मांडवीय यांच्याकडे केली. या कामांना शक्य तितक्या लवकर मंजुरी देण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिले असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.





