पुणे विद्यापीठात शिक्षक, कर्मचाऱ्यांची 30 टक्के उपस्थिती अावश्यक

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रशासकीय कार्यालयातील कर्मचारी, शैक्षणिक विभागातील शिक्षक यांना आता 30 टक्के प्रमाणे उपस्थित राहावे लागणार आहे, असे आदेश कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी काढले.
लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने शिथिलता आणली आहे. त्यानुसार सुधारित आदेशही निर्गमित केले. विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय कार्यालयांनाही आदेश लागू असल्याचे विद्यापीठाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. सुरक्षा, आरोग्य केंद्र, स्थावर, गृहव्यवस्थापन विभाग ही कार्यालये अत्यावश्यक सेवा प्रदान करणारी असल्याने आवश्यकतेनुसार पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत.
ही कार्यालये वगळता इतर कार्यालयांत 30 टक्के प्रमाणे उपस्थिती राहणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल, त्यांनी घरी राहून कार्यालयीन कामकाज करावे. रजेवर असणाऱ्यांचा यात समावेश नाही.
कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार आळीपाळीने कर्मचारी कार्यालयात बोलविताना शक्यतोवर सहमतीने निर्णय घ्यावा लागणार आहे. यासंदर्भात कार्यालय प्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार आहे. विभागप्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा अहवाल प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.





