Nagpur News : नागपुरमध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघांसह एका बिबट्याचा मृत्यू

नागपूर : नागपूर येथे बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली. वाघ आणि बिबट्यामध्ये उलट्या, डोळ्यात पाणी येणे, छातीत इन्फेक्शन आणि ताप अशी लक्षणे दिसून आल्याचे सांगितले.
येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू एच-५एन-१ विषाणूमुळे झाल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला आहे. डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले हाेते.
प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल १ जानेवारी २०२५ रोजी समोर आला होता. या नंतर रेस्क्यू सेंटरमधील २६ बिबट्या आणि १२ वाघांची तपासणी केली असता ते निरोगी आढळले. तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते. तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता.
वाघ डिसेंबर २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरातील टीटीसीतून तर बिबट बुलढाण्यातून मे २०२४ मध्ये आला होता. डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यात विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्राणी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची रूपरेषा आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या घटनेतील तीन वाघ आणि एका बिबट्याचा २० ते २३ डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला.





