पिंपरी | वडगाव येथील लोकन्यायालयात ३ हजार १४६ प्रकरणे निकाली

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – वडगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात तब्बल तीन हजार १४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. याद्वारे विविध संस्थांची एकूण चार कोटी ८२ लाख ३७ हजार ७९५ रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोक न्यायालय पार पडले.
लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली विविध संस्थांची, मोटार वाहन कायद्यांतर्गत येणारी नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विविध बँकांची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे (१३८), नगरपालिका, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी, एमएसईबी व दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवसभरात ्र हजार १४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडीअंती तब्बल ४ कोटी ८२ लाख ३७ हजार ७९५ रुपयांची वसुली झाली.
लोकन्यायालयात पॅनल प्रमुख म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर.ए. शिंदे, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आर. एन. शिंदे, एस. पी. जाधव, व्ही. आर. डोईफोडे, एस. ए. माळी, के. ए. देशपांडे यांनी काम पाहिले.
तर पॅनल जज म्हणून अॅड. सी. एस. जाधव, अॅड. वाय. पी. गोरे, अॅड. आर. एस. नाणेकर, अॅड. एस. ई. पडवळ, अॅड. आर. आर. परब, अॅड. जे. एस. शितोळे, अॅड. कांचन चिमटे यांनी काम पाहिले. वडगाव मावळ बार असोसिएडानचे अध्यक्ष संजय वांद्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहाय्यक अधिकारी नितीन महादे आदींचे सहकार्य लाभले.




