राज्यात लोणारसह 3 नवीन अभयारण्य घोषित; 12 संवर्धन राखीव क्षेत्रही जाहीर

मुंबई – राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18वी बैठक आज वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, वन क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा. त्यांच्या समस्याकडे लक्ष द्या. वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने विचार करा. वनक्षेत्रातील विकास कामांबाबत प्रस्ताव आणताना, त्यांचा सर्व अंगानी विचार व्हावा. केवळ सर्वेक्षणाच्या मान्यतेनंतर कधीकधी थेट प्रकल्पांना मान्यता मिळाल्याप्रमाणे कामे सुरु होतात. तसे होऊ नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी अशा प्रस्तावांबाबत संबंधितासह, वन्यजीव मंडळाच्या सदस्य आणि समित्यांसमोर सादरीकरण केले जावे.
राज्यात आतापर्यंत एकूण 15 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील 8 क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या 12 संवर्धन क्षेत्रांची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्यातील 12 संवर्धन राखीव क्षेत्र
आज घोषित करण्यात आलेल्या 12 संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (66.04 चौ.कि.मी), अलालदारी (100.56 चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (84.12 चौ.कि.मी), मुरागड (42.87 चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (96.97 चौ.कि.मी), इगतपुरी (88.499 चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (47.62 चौ.कि.मी), रोहा (27.30 चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (28.44 चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (1.07 चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (5.34 चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (103.92 चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.
राज्यात नवीन 3 अभयारण्य क्षेत्र
मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. याशिवाय राज्यात 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर-सुपे (5.145 चौ.किमी.), बोर (61.64), नवीर बोर (60.69), विस्तारित बोर (16.31), नरनाळा (12.35), लोणार वन्यजीव अभयारण्य (3.65), गुगामल राष्ट्रीय उद्यान (361.28 चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (22.37), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (29.90), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (2.17) यांचा समावेश आहे.




